पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ICSE २०२६ च्या परीक्षेत पांचगणी येथील ‘सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ची विद्यार्थिनी कु. साई वाणी हिने उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ‘सीआयएससीई’ मंडळाच्या वतीने तिला मानाचे ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
संबंधित विषयात किमान १०० विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना अत्यंत चमकदार व गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे विशेष प्रमाणपत्र प्रदान केले जाते. साईने मिळवलेल्या या बहुमानामुळे तिच्या गुणवत्तेवर मोहर उमटली आहे.
साई वाणी हिच्या या यश बद्दल शाळेच्या प्राचार्या सिस्टर ब्रिटो मॅरी, व्यवस्थापिका सिस्टर ब्लांच, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. साई वाणीच्या या घवघवीत यशामुळे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



