पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” या अभंगवाणीची प्रचिती देत लाखो भाविकांच्या उपस्थितीत करहर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याचे आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या वैकुंठवासी ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ‘ग्यानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल रुक्मिणी’च्या जयघोषाने संपूर्ण करहर नगरी दुमदुमून गेली होती.
पहाटेपासूनच येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत महापूजा संपन्न झाल्यानंतर दर्शनरांग खुली करण्यात करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी विठूरायाचे दर्शन घेऊन धन्यता मानली.

दुपारी बाराच्या सुमारास वैकुंठवासी ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी काटवली गावातून सुरु केलेला हा सोहळा येथून सुरु झाला. काटवली येथून भव्य दिंडी सोहळा करहरकडे मार्गस्थ झाला. कळंबे महाराजांची कर्मभूमी असलेल्या बेलोशी येथे काही काळ विसावा घेतल्यानंतर, महू धरणाच्या भिंतीवर सोहळ्याचे पहिले नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले. याचबरोबर काटवली येथून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, बेलोशी येथून तुकाराम महाराज पालखी आणि दापवडी येथून संत गाडगेबाबा पालखी सोहळा करहरच्या दिशेने मार्गस्थ झाला. तर हातगेघर येथून आलेला पालखी सोहळा पानस पाटी येथे मुख्य दिंडीत सामील झाला.

सायंकाळी चार वाजता मुख्य बाजारपेठेत सोहळा दाखल होताच वालुथ, करंदी आणि परिसरातील अनेक दिंड्या यामध्ये सहभागी झाल्या. वालुथ येथील सोहळा करहरमध्ये आल्यानंतर रंगलेल्या भव्य रिंगण सोहळ्यानंतर माऊलींच्या सजवलेल्या अश्वाचे उभे रिंगण आणि भाविकांची विठ्ठल पालखी भेट हा क्षण उपस्थितांसाठी अद्भूत ठरला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे व मान्यवरांनी दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांचा विशेष सन्मान केला.
सोहळ्या दरम्यान सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार आणि फराळाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगूल, मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नेत्यांनी लुटला फुगडीचा आनंद!
भक्तीच्या या अनोख्या सोहळ्यात राजकीय नेतेही पूर्णपणे रंगून गेल्याचे पाहायला मिळाले. विठ्ठलमय वातावरणात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरत आनंद लुटला. लोकप्रतिनिधींचा हा आपुलकीचा आणि भक्तीभाव जपणारा अंदाज उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.



