पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावरील माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार आणि महाबळेश्वरमधील मोबाईल व्यावसायिक नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली) यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे टेकवली गावासह संपूर्ण महाबळेश्वर शहरावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या माचूतर गावाजवळ झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे निघालेली राजमाता जिजाऊ एसटी बस (क्र. एमएच १४ एनई ४२२५) आणि महाबळेश्वरच्या दिशेने येणारी दुचाकी (क्र. एमएच ११ एव्ही २०८८) यांच्यात ही समोरासमोर धडक झाली. धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि बसच्या वाहकाने तातडीने धाव घेत गंभीर जखमी नरेश भोंडेकर यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मृत नरेश भोंडेकर हे महाबळेश्वर एसटी बसस्थानकाच्या मागे, हॉटेल ड्रीमलँडसमोरील गाळ्यात मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे दुकानात येत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामीण रुग्णालयात व्यापारी, नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली होती. अत्यंत साध्या कुटुंबातील असलेल्या नरेश भोंडेकर यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती अचानक गेल्यामुळे भोंडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि हवालदार संतोष शेलार पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर महाबळेश्वर–मेढा मार्गावरील धोकादायक वळणांवर तातडीने सुरक्षा उपाययोजना आणि इशारा फलक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.



