Home » जावळी » केळघर घाटात काळ्याकड्यावर दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प :मदतकार्यादरम्यान जेसीबीवरच दगड पडले, चालक बचावला

केळघर घाटात काळ्याकड्यावर दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प :मदतकार्यादरम्यान जेसीबीवरच दगड पडले, चालक बचावला

पांचगणी न्यूज नेटवर्क

​केळघर : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि परिसर अक्षरशः झोडपून निघाला आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका वाहतुकीला बसला असून, आज सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावरील केळघर घाटात ‘काळ्याकड्या’नजीक डोंगराची भलामोठी दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीसोबत आलेला मोठा दगड-मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

​पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांतून महाबळेश्वरला जाण्यासाठी मेढामार्गे केळघर घाट हा अत्यंत सोयीचा आणि जवळचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गावर दररोज पर्यटकांची आणि स्थानिक प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, दरड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास अडकून पडल्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.

​घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि आपत्कालीन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने दगड आणि माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. मात्र, मदतकार्य सुरू असतानाच अचानक पुन्हा डोंगराचा भाग खचून काम करणाऱ्या जेसीबीवरच भलीमोठी दरड कोसळली.

​या घटनेमुळे घटनास्थळी काही काळ घबराट पसरली. मात्र, जेसीबी चालकाने कमालीचे प्रसंगावधान दाखवत ऐनवेळी वाहनातून बाहेर उडी मारली. त्याच्या या सतर्कतेमुळे चालकाचा बालंबाल जीव वाचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​दुर्गाटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवली आहे. महाबळेश्वरकडून सातारा किंवा इतर ठिकाणी जाणारी वाहतूक पाचगणी मार्गे, तर साताऱ्याकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक मोळाचा ओढा येथून पाचवड-वाई मार्गे वळवण्यात आली आहे. पाऊस सतत सुरू असतानाही रात्री उशिरापर्यंत रस्ता साफ करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers