Home » कराड » खाकी वर्दी हादरली! कराड शहर पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस शिपायाची कडेपूर येथे आत्महत्या

खाकी वर्दी हादरली! कराड शहर पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस शिपायाची कडेपूर येथे आत्महत्या

शांत आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या पाऊलामुळे पोलीस दलासह सातारा जिल्ह्यात खळबळ; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड | : कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुण पोलीस शिपायाने राहत्या घराशेजारील जनावरांच्या शेडमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कडेपूर (ता. कडेगाव) येथे उघडकीस आली आहे. अत्यंत तरुण वयात आणि कर्तव्य बजावत असताना या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवल्याने कराड पोलीस दलासह संपूर्ण सातारा जिल्हा आणि कडेगाव तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आशुतोष अजित माने (वय २५, रा. टेलिफोन एक्सचेंज पाठीमागे, कडेपूर, ता. कडेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुण पोलीस शिपायाचे नाव आहे.

​आशुतोष माने हे कराड शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून सेवा बजावत होते. आपल्या शांत, संयमी, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांनी पोलीस दलात तसेच मित्रपरिवारात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एक उमदा आणि तरुण सहकारी अचानक असा जगाचा निरोप घेईल, यावर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा विश्वास बसत नाहीये.

​कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. २३) पहाटे कडेपूर येथील त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये आशुतोष माने यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

​घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. कडेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. आशुतोष यांनी एवढ्या लहान वयात हे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांच्या या निर्णयामागे काही कौटुंबिक, मानसिक की कार्यालयीन ताणतणाव होता? या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली नसल्याचे समजते. कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers