Home » महाबळेश्वर » घोगलवाडीत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दुभती गाय ठार; महाबळेश्वर तालुक्यात भीतीचे वातावरण, भरपाईची मागणी

घोगलवाडीत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दुभती गाय ठार; महाबळेश्वर तालुक्यात भीतीचे वातावरण, भरपाईची मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर : तालुक्यातील घोगलवाडी येथे शनिवारी रात्री वन्यप्राण्याच्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याची दुभती गाय जागीच ठार झाली. या घटनेमुळे संपूर्ण घोगलवाडी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. वन विभागाने तात्काळ पंचनामा करून बाधित शेतकऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

​घोगलवाडी येथील स्थानिक शेतकरी बबन धोंडू राजपुरे यांच्या मालकीच्या गाईवर शनिवारी रात्री अज्ञात वन्यप्राण्याने अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळकज उडाली. प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला वाघ किंवा बिबट्याने केला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, मात्र हल्लेखोर वन्यप्राण्याची नेमकी ओळख वन विभागाच्या अधिकृत तपासणीनंतर आणि पगमार्क्स (पाऊलखुणा) वरूनच स्पष्ट होणार आहे.

​या घटनेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुभती गाय दगावल्याने राजपुरे यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जंगलालगत असलेल्या या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जनावरे बाहेर बांधणे आता धोकादायक बनले आहे.

वन विभागाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करावा आणि पीडित शेतकऱ्याला योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात विनाकारण फिरणे टाळावे आणि पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत, असे आवाहन केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers