पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ: क्रीडा क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या बामणोली (तर्फ कुडाळ) येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या खेळाडूंनी आपली विजयी परंपरा कायम राखत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, हुमगाव येथे १६ व १७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जावली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बामणोली विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या आणि १४ वर्षाखालील मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. तर १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी उपविजेतेपद (द्वितीय क्रमांक) पटकावत चमकदार कामगिरी केली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, १६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सामन्यांमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करत प्रथम विजेतेपद पटकावले. याच दिवशी १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या दिवशी, १७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यांमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने मैदान गाजवत प्रथम क्रमांक पटकावला आणि जिल्हास्तराचे तिकीट मिळवले. तर १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारत द्वितीय क्रमांकावर समाधान मानले. विद्यालयाच्या मुला-मुलींच्या चारही संघांनी अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारून संपूर्ण तालुक्यात आपल्या क्रीडा कौशल्याचा दबदबा निर्माण केला.
या अभूतपूर्व यशाबद्दल यशस्वी खेळाडू, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमींमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत धनवडे, उपाध्यक्ष शिवाजीदादा तरडे, सचिव विक्रमसिंह धनवडे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख शशिकांत शेलार, मुख्याध्यापक शशिकांत शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश तरडे, बामणोलीच्या सरपंच रेखाताई तरडे, उपसरपंच पवन तरडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



