पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : जावळी तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या दुर्गम घोटेघर गावातील रामवाडी वस्तीत दिवसाढवळ्या चोरीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून आत घुसलेल्या अट्टल चोरट्याला ७० वर्षांच्या वृद्ध आजींनी आपल्या अफाट धैर्याच्या जोरावर पळवून लावले. आजींनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे घरातील लाखो रुपयांचा ऐवज वाचला असून एक मोठी चोरी टळली आहे. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण जावळी तालुक्यात, विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, घोटेघर येथील रामवाडी वस्तीत हिराबाई कोंडीबा रांजणे (वय ७० वर्षे) या आपल्या कुटुंबासह राहतात. आज सकाळी त्या काही घरगुती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्या काम आटोपून परतल्या असता, त्यांना आपल्या बंद घराचे दार उघडे असल्याचे दिसले. घरात कोणीतरी असल्याचा संशय आल्याने त्यांनी अत्यंत धैर्याने आत प्रवेश केला. समोर पाहतात तर काय, एक अज्ञात इसम कपाटाचे कुलूप तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड शोधण्यासाठी कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त फेकत होता.
घरात चोर घुसल्याचे थेट डोळ्यांसमोर पाहूनही आजी अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जागीच मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रतिकारामुळे चोरटा पुरता घाबरला. आजी आपल्याला पकडणार हे लक्षात येताच, त्याने आजींना जोराचा गुंगारा दिला आणि घरातून थेट बाहेर पळ काढला.
आजींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ आणि तरुण तातडीने घराच्या दिशेने धावले. लोकांना जमा झालेले पाहताच चोरट्याने आपली नंबर नसलेली दुचाकी (मोटारसायकल) सुरू केली आणि जोरात आखेगणी गावाच्या दिशेने पोबारा केला. गावातील धाडसी तरुणांनी आणि नागरिकांनी तातडीने स्वतःच्या दुचाकीवरून या चोरट्याचा थरारक पाठलाग केला. घोटेघर ते सायघर परिसरातील डोंगरदऱ्यांच्या रस्त्यांवर ग्रामस्थांनी चोराचा माग काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र चोरटा सराईत असल्याने तो चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
या घटनेमुळे घोटेघर आणि संपूर्ण परिसरात कमालीची घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटे रेकी करून ज्या घरात केवळ वृद्ध व्यक्ती आहेत किंवा जी घरे सकाळी काही काळासाठी बंद असतात, अशा घरांना लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या टोळीचा मेढा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
१५ दिवसांपूर्वी शिंदेवाडीत झाली होती चोरी; पोलिसांसमोर आव्हान!
जावळी तालुक्यातील चोरीचे सत्र केवळ घोटेघरपुरते मर्यादित नसून, अवघ्या १५ दिवसांपूर्वी शेजारील शिंदेवाडी येथेही अशीच एक गंभीर घटना घडली होती. तेथेही सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास मंगेश शिंदे यांच्या बंद घरात घुसून चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. या चोरीचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नसतानाच आता घोटेघरमध्ये दुसरा प्रयत्न झाला आहे. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मेढा पोलीस ठाण्याच्या पथकाने या परिसरात गस्त वाढवून या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



