पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जावळी तालुक्याला झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका काटवली गावाला बसला असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक ग्रामस्थ तुकाराम श्रीपती बेलोशे यांचे राहते घर पूर्णपणे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याने बेलोशे यांचे कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर आले असून हे कुटुंब पूर्णपणे बेघर झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरातील संसारोपयोगी साहित्याचे आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तातडीने पावले उचलत आज घटनास्थळी धाव घेतली आणि झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा केला. काटवली सजाचे तलाठी प्रशांत माने यांनी हा पंचनामा पूर्ण केला. या पंचनाम्यामध्ये बेलोशे यांच्या घराचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पंचनाम्यादरम्यान माजी सरपंच मधुकर बेलोशे, तुकाराम बापू बेलोशे, राजेंद्र बेलोशे, विजय बेलोशे, नवनाथ बेलोशे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बेलोशे कुटुंब अत्यंत गरीब असून ऐन पावसाळ्यात राहते घर हिरावले गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने आणि महसूल विभागाने केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता, या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि राहण्यासाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी तीव्र आणि आग्रही मागणी काटवलीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.



