Home » मुंबई » जावळी बँकेच्या यशाचा गौरव; अध्यक्ष विक्रमजी भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ प्रदान

जावळी बँकेच्या यशाचा गौरव; अध्यक्ष विक्रमजी भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ प्रदान

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि शिस्तबद्ध कारभाराच्या जोरावर दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेला यशाच्या शिखरावर नेणारे अध्यक्ष विक्रमजी भिलारे यांना समर्थ सातारा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ नुकताच दहिसर येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते आणि सहकुटुंब उपस्थितीत विक्रमजी भिलारे यांना हा मानाचा सन्मान देऊन गौरवण्यात आले.

​दहिसर येथील लता मंगेशकर हॉल येथे पार पडलेल्या या सोहळ्याला समर्थ सातारा प्रतिष्ठानचे सचिव सुभाष वांगडे, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, राजकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसह जावळी बँकेचे अधिकारी, सभासद आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रमजी भिलारे यांच्या गतिमान नेतृत्वाखाली बँकेच्या व्यवसायात तब्बल ८०० कोटींची विक्रमी वाढ झाली असून, बँकेचा एकूण व्यवसाय ९५० कोटींवरून थेट १७५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक सुदृढतेच्या बळावर बँक लवकरच ‘शेड्युल्ड बँक’ होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सहकार वर्तुळातील याच ऐतिहासिक कामगिरीची दखल घेऊन प्रतिष्ठानतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.

​पुरस्काराला उत्तर देताना, विश्वास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताची जपवणूक यामुळेच आज जावळी बँक सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ बनली असून, हा सन्मान बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आणि ग्राहकांच्या अढळ विश्वासाचा गौरव असल्याचे मनोगत विक्रमजी भिलारे यांनी व्यक्त केले.

​या सोहळ्यास बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी चेअरमन व विद्यमान संचालक चंद्रकांत गावडे, संचालक विश्वनाथ धनावडे, विजय कदम, वसंतराव तरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास ललवानी, जनरल मॅनेजर गोविंद जाधव, डीजीएम अनिल सणस, शीतलचंद्र खोत, प्रशासन अधिकारी, युनियन प्रतिनिधी महादेव वाडकर, जगदीश कदम यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रमजी भिलारे यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सहकार क्षेत्रातून आणि जावळी तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers