पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकीय पटलावर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणि सहकारातील वर्चस्वाचा प्रत्यय दिला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत बाबासाहेब कदम यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता शिवेंद्रसिंहराजेंचीही बिनविरोध निवड निश्चित झाल्याने साताऱ्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात भोसले घराण्याच्या दबदब्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालकपदापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक नाड्यांवर ताबा मिळवण्याची ही लढाई मानली जाते. सुरुवातीला शिवेंद्रराजेंविरोधात अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असे चित्र रंगवले जात होते. मात्र, अर्ज माघारीच्या निर्णायक टप्प्यावर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. पडद्यामागे झालेल्या गुप्त घडामोडी, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची मध्यस्ती आणि रणनीती यामुळेच कदम यांनी माघार घेतल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे. या घडामोडीमुळे विरोधकांच्या रणनीतीला मोठा सुरुंग लागला असून महायुतीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे.
साताऱ्याच्या राजकारणात सहकार क्षेत्राचा वाटा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शेतकरी, विकास सेवा सोसायट्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या बँकेत सत्ता राखणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे मुख्य ध्येय असते. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजेंचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या बिनविरोध निवडीमुळे महायुतीतील समन्वय अधिक मजबूत झाला असून, उर्वरित जागांवरही महायुतीचे पारडे जड राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरी दोन प्रमुख राजघराण्यातील नेत्यांची बिनविरोध निवड झाली असली, तरी २१ संचालकपदांच्या अंतिम सत्तेचा संग्राम अजून बाकी आहे. उर्वरित जागांवर कोण बाजी मारणार आणि निवडणुकीनंतर बँकेची धुरा कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रसिंहराजेंनी घडवून आणलेली ही माघार विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात असून, आगामी काळात जिल्हा बँकेच्या निर्णयप्रक्रियेत आणि जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये शिवेंद्रराजेंचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे.



