Home » भिलार » जेसीबीतून शाही मिरवणूक! पांगारी जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे ऐतिहासिक स्वागत

जेसीबीतून शाही मिरवणूक! पांगारी जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे ऐतिहासिक स्वागत

पांचगणी न्यूज नेटवर्क

भोसे : शाळेचा पहिला दिवस म्हणजे पालकांची धावपळ आणि मुलांचे रडणे हे चित्र ठरलेले असते. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी येथे आज एक वेगळाच इतिहास रचला गेला. पहिल्याच दिवशी चक्क एका सुंदर सजवलेल्या ‘जेसीबी’मध्ये (JCB) बसवून नवख्या चिमुरड्यांची गावातून वाजत-गाजत शाही मिरवणूक काढण्यात आली! या कल्पक प्रयोगामुळे बच्चेकंपनीचा रडका चेहरा गायब होऊन मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमलले.

​या अनोख्या स्वागतासाठी जेसीबीला रंगीबेरंगी फुगे आणि फुलांनी आकर्षक सजवले होते. या जेसीबीतून जेव्हा पहिलीतील लहान मुले गावातून फिरली, तेव्हा ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. या ‘जेसीबी सफारी’ने मुलांचा शाळेचा पहिला दिवस आयुष्यभरासाठी संस्मरणीय बनवला.

​मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात मुख्य स्वागत समारंभ पार पडला. याप्रसंगी माजी सरपंच जाणू पांगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे, मुख्याध्यापक कमल आंब्राळे, सह शिक्षक वनिता कदम, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांची मोठी उपस्थिती होती.

​यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे म्हणाले, “मुलांच्या मनातील शाळेची भीती पळून जावी आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, म्हणूनच ग्रामस्थ आणि शाळेने मिळून हा अनोखा उपक्रम राबवला आहे.” तर माजी सरपंच जाणू पांगारे यांनी, “शिक्षकांची ही कल्पकता कौतुकास्पद असून गावातील शाळा डिजिटल व गुणात्मक करण्यासाठी ग्रामस्थ नेहमीच पाठीशी राहतील,” असा विश्वास दिला.

​हा आमच्या प्रगतीचा बुलडोझर: मुख्याध्यापक

​शाळेच्या मुख्याध्यापक कमल आंब्राळे यांनी सर्वांचे स्वागत करत सांगितले की, “पहिलीत येणाऱ्या मुलांच्या मनात शाळेबद्दल भीतीऐवजी प्रचंड उत्सुकता असावी हाच आमचा उद्देश होता. हा जेसीबी आमच्या जि. प. शाळेच्या प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा ‘बुलडोझर’ आहे.”

​शेवटी सह शिक्षक वनिता कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वच नवागतांना गुलाबपुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या हटके आणि कौतुकास्पद उपक्रमाची चर्चा आता संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात रंगली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers