पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: जावळी तालुक्यातील दापवडी येथील नामांकित आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ‘कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली)’ उद्या, शनिवारी आपला ३६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या अभिमानास्पद वाटचालीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि शासकीय सेवांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे व परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा गौरव सोहळा दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होणार असून, परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सहकार क्षेत्रातील आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक व शैक्षणिक क्रांतीला बळ देणाऱ्या या संस्थेने नेहमीच स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन दिले आहे. यावर्षी संस्थेच्या वतीने विशेष कौतुकास पात्र ठरलेल्या तीन सुपुत्रांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. यामध्ये भारतीय वायूसेनेत निवड झाल्याबद्दल सई प्रतापराव पाटील, महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अजय अशोक साळुंखे आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल अक्षदा नथुराम रांजणे या तिघांचा यामध्ये समावेश आहे. देशसेवा, सुरक्षा आणि शासकीय सेवेत थेट गवसणी घालणाऱ्या या तरुणांच्या यशामुळे दापवडी आणि संपूर्ण जावळी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे यांनी सांगितले की, दापवडी आणि संपूर्ण परिसरातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, महिला आणि तरुण वर्गाला आर्थिक स्थैर्य लाभावे, त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी या पवित्र उद्देशाने वै. दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज संस्थेने विश्वासाची ३६ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. केवळ बँकिंग व्यवसाय न करता, समाजातील गुणवंतांना आणि भावी पिढीला प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य मानून संस्था दरवर्षी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचा गौरव करत आली आहे.
ग्रामीण भागातील या ज्वलंत गुणवत्तेचे कौतुक करण्यासाठी आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दापवडी, काटवली व परिसरातील सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे आणि ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे यांनी केले आहे.



