Home » पांचगणी » निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश! वटपौर्णिमेचे औचित्य साधून आंब्रळ ग्रामपंचायतीकडून तब्बल २१ वटवृक्षांची लागवड

निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश! वटपौर्णिमेचे औचित्य साधून आंब्रळ ग्रामपंचायतीकडून तब्बल २१ वटवृक्षांची लागवड

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : केवळ पारंपरिक पद्धतीने सण साजरा न करता, बदलत्या हवामानात निसर्गाचे ऋण फेडण्याचा एक आदर्श वस्तुपाठ महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. २९ जून रोजी असलेल्या वटपौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून आंब्रळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तब्बल २१ वटवृक्षांची लागवड करून अत्यंत अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला.

​वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू संस्कृतीमध्ये महिला वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतात. मात्र, सध्याच्या काळात सातत्याने होणारी वृक्षतोड आणि बिघडत चाललेला निसर्गाचा समतोल पाहता, केवळ पूजनच न करता नवीन वृक्षांची निर्मिती आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून आंब्रळ ग्रामस्थांनी यावर्षी केवळ धार्मिक विधी न करता थेट वृक्षारोपणाचा हा स्तुत्य आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.

​या अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध उद्योगपती गुरुदत्त ताकवणे व कांचन देवदत्त पाटील यांनी आपले सामाजिक दायित्व जपत तब्बल २१ वटवृक्षांची उत्तम प्रतीची रोपे ग्रामपंचायतीला दान केली. त्यांच्या या मोलाच्या दातृत्वामुळे आंब्रळ गावाला भविष्यात एक समृद्ध आणि हिरवागार वारसा लाभण्यास मोठी मदत होणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेमुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य तर खुलणारच आहे, शिवाय पर्यावरण रक्षणालाही मोठी गती मिळणार आहे.

​या पर्यावरणपूरक मोहिमेला संपूर्ण गावाने एक चळवळ म्हणून पाठबळ दिले. या उपक्रमाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अमोल धुमाळ, उपसरपंच भानुदास बिरामणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश भिलारे, विष्णू आंब्राळे, जयवंत रांजणे, सुहास आंब्राळे, भानुदास ओंबळे, संदीप आंब्राळे, सुनील आत्माराम आंब्राळे, हनुमंत आंब्राळे, वरद आंब्राळे आणि परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात आणि सक्रियतेने या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवला.

​केवळ सण साजरा करून न थांबता, भावी पिढीला शुद्ध हवा आणि सावली देणारा हा “हिरवा वसा” जोपासल्याबद्दल सध्या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून आंब्रळ ग्रामपंचायत आणि येथील सुज्ञ ग्रामस्थांचे भरभरून कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers