Home » कराड » नीटमध्ये अपयश; नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या : विषारी औषध प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू; शेरे परिसरात हळहळ

नीटमध्ये अपयश; नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या : विषारी औषध प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू; शेरे परिसरात हळहळ

पांचगणी न्यूज नेटवर्क

मसूर  ः नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून कराड तालुक्यातील शेरे स्टेशन येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. २७) तिचा मृत्यू झाला.

 

समीक्षा दीपक पवार (वय १८, रा. शेरे स्टेशन, ता. कराड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गेल्या वर्षीची नीट परीक्षा तिने दिली होती. निकालात अपयश आल्याने ती मानसिक तणाव आणि नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. मात्र, ही बाब तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितली नव्हती.

 

दोन दिवसांनंतर विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

 

या घटनेमुळे शेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मसूर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पन्हाळे करीत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers