Home » पांचगणी » पांचगणी पालिकेचा ‘कोंडवाडा’ कागदावरच? मोकाट जनावरांच्या हैदोसामुळे पर्यटक-स्थानिक त्रस्त; थेट नगरसेवकाच्या घरात घोड्याचा ठिय्या!

पांचगणी पालिकेचा ‘कोंडवाडा’ कागदावरच? मोकाट जनावरांच्या हैदोसामुळे पर्यटक-स्थानिक त्रस्त; थेट नगरसेवकाच्या घरात घोड्याचा ठिय्या!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या पांचगणी शहराला सध्या मोकाट जनावरांच्या समस्येने पुरते वेढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून, यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असतानाही, पांचगणी नगर पालिका प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून विचारला जात आहे.

​सध्या पांचगणी या पर्यटन स्थळावरील अंतर्गत रस्त्यांसह वाई-पांचगणी-महाबळेश्वर हा मुख्य हायवे आणि पांचगणी-गणेशपेठ रस्ता मोकाट जनावरांचे आगार बनला आहे. या मार्गांवर घोडे, गाढवे आणि गायींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही जनावरे रस्त्यांच्या मध्यभागीच झुंडीने ठिय्या मांडून बसत असल्याने, सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. यामुळे येथे दररोज अपघाताची शक्यता बळावली आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, बस स्थानक परिसर, शॉपिंग सेंटर, नाका, महात्मा फुले शाळा, कॉलेज परिसर आणि गॅस गोडाऊन या गजबजलेल्या भागातही या जनावरांचा सुळसुळाट झाला आहे.

या समस्येने आता गंभीर रूप धारण केले असून ही मोकाट जनावरे थेट लोकांच्या घरात आणि दुकानांत घुसू लागली आहेत. नुकतीच रात्रीच्या वेळी एक धक्कादायक आणि अजब घटना घडली. एका मोकाट घोड्याने चक्क पांचगणीतील एका नगरसेवकाच्या घरातच आपला मोर्चा वळवला आणि तिथेच ठिय्या मांडला. सकाळी जेव्हा घरातील सदस्य जागे झाले, तेव्हा घरात घोडा पाहून त्यांची चांगलीच पाचावर धारण बसली. घोड्याने घरालाच आपला तबेला बनवल्याचे पाहून घाबरलेल्या कुटुंबियांनी तातडीने नगरपालिकेशी संपर्क साधला. जर थेट लोकप्रतिनिधींच्या घरातच अशी जनावरे शिरत असतील, तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, गेली १० ते १५ वर्षे झाली तरी नगरपालिकेने मोकाट जनावरांवर ठोस अशी एकही कारवाई केलेली नाही. पालिकेचा कोंडवाडा नक्की कुठे आहे, तो कार्यरत आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. पालिकेकडे अधिकृत कोंडवाडाच उपलब्ध नसल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून, कोंडवाडा केवळ कागदावर आणि गुलदस्त्यातच अडकून पडला आहे.

​या निष्काळजीपणामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. पालिकेने ही आळस झटकावी आणि तातडीने या मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन त्यांची योग्य ठिकाणी रवानगी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers