Home » पांचगणी » पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला ४० वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डीत तृतीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला ४० वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डीत तृतीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि अंबिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘मैत्री चषक’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोरगिरी येथील मोरणा विद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत ४० वर्षे व त्यापुढील वयाच्या जिल्ह्यातील अनेक माजी आणि दिग्गज खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या चुरशीच्या स्पर्धेत पाचगणीच्या स्थानिक व्यायाम मंडळाच्या संघाने आपल्या बहारदार आणि अनुभवाच्या जोरावर अटीतटीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावून पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

 

​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील जुन्या जाणत्या कबड्डी पटूंना पुन्हा एकदा मैदानावर उतरून आपला दम दाखवण्याची संधी मिळाली, ज्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वाढत्या वयातही खेळाडूंचा शारीरिक आणि मानसिक फिटनेस पाहून उपस्थित तरुण वर्ग कमालीचा प्रोत्साहित झाला. वय पडताळणीसाठी अधिकृत ओळखपत्रांची कडक अंमलबजावणी करत अत्यंत पारदर्शक वातावरणात हे सामने पार पडले.

 

​या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पाचगणीच्या व्यायाम मंडळाच्या संघात संतोष गोळे, संदेश कासुर्डे, रवी गोळे, राजू काकडे, दीपक पारठे, शशिकांत भिलारे, राजू दुधाने, अमोल कळंबे, जाधव आणि संजय राजपुरे या कसलेल्या खेळाडूंचा समावेश होता. या सर्वच खेळाडूंनी मैदानावर चढाई आणि पकडीचा उत्कृष्ट नमुना पेश केला. उपांत्य फेरीत केवळ एका गुणाच्या निसटत्या फरकाने संघाला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांच्या या झुंजार खेळाचे संपूर्ण मैदानात कौतुक झाले. या यशस्वितेबद्दल संघाला कायम चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

​या संघाने मंडळाचे संचालक अंकुश आबा मालुसरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या यशाबद्दल आज पाचगणी येथे मंडळाचे संचालक नानासाहेब कासुर्डे, राजूशेठ राजपुरे, राजू आबा भिलारे, शेखर दादा कासुर्डे, रावसाहेब भिलारे, प्रविणशेठ भिलारे, यशवंत पारठे आणि शरद कासुर्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण संघाचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिबाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला आंनदोत्सव साजरा करण्यात आला. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या क्रीडा कौशल्यामुळे संपूर्ण तालुक्यातून आणि क्रीडा वर्तुळातून या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे जोरदार अभिनंदन होत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers