Home » पांचगणी » पाचगणीत जनसेवेचा नवा अध्याय : ‘टीम एस ओ एस ‘ च्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे सपोनी दिलीप पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पाचगणीत जनसेवेचा नवा अध्याय : ‘टीम एस ओ एस ‘ च्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे सपोनी दिलीप पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : दुर्गम भागात आणि आपत्कालीन परिस्थितीत देवदूतासारखी धावून जाणारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टीम एस ओ एस आणि ‘ॲनिमल रेस्क्यू टीम’च्या सामाजिक कार्यात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाचगणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘टीम एस ओ एस ‘ च्या नवीन अद्ययावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पांचगणी पोलीस ठाण्यात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या नवीन रुग्णवाहिकेचे उद्घाटन महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचगणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शहारोम जवानमर्दी होते. यावेळी रोटरी अध्यक्ष अमित बोधे, रोटरी सदस्य नितीन कासुर्डे, किरण पवार,जयवंत भिलारे, तसेच रोटरी, रोट्रॅक्ट, व एस ओ एस चे सदस्य उपस्थित होते.
​’टीम एस ओ एस ‘ गेल्या तब्बल १० वर्षांपासून महाबळेश्वर, पाचगणी आणि जावली तालुक्याच्या दुर्गम भागात कोणतीही नफा-तोटा न पाहता अविरतपणे २४ तास रुग्णवाहिका सेवा देत आहे. मात्र, गेल्या दशकभरात सततचा वापर आणि खराब रस्त्यांमुळे जुनी रुग्णवाहिका कालबाह्य झाली होती, ज्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि ही मोफत सेवा अखंडपणे सुरू राहावी, या उदात्त हेतूने संस्थेने विविध दाते व हितचिंतकांच्या मदतीने ही नवीन आधुनिक रुग्णवाहिका खरेदी केली आहे.

​या प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी टीमच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “खाकी वर्दीतील पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतातच, पण सामाजिक बांधिलकी जपत ‘टीम एस ओ एस ‘चे तरुण मध्यरात्रीही एका फोनवर मदतीला धावून येतात, हे कौतुकास्पद आहे. संकटसमयी तत्परतेने मिळणारी वैद्यकीय मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते आणि हेच पुण्यकर्म ही टीम करत आहे. पोलीस दलाच्या वतीने मी या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

​कार्यक्रमादरम्यान रुग्णवाहिका सेवेची संपूर्ण माहिती देताना टीमचे सदस्य निहाल बागवान यांनी, “पैशांअभावी किंवा वाहनाअभावी कोणत्याही गरिबाचा जीव जाता कामा नये, हेच आमचे ध्येय आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. तसेच ही रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी, साहित्य आणि इतर माध्यमांतून सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचे व पाठीराख्यांचे त्यांनी जाहीर आभार मानले.

​या सोहळ्यात ‘टीम एस ओ एस ‘चे सदस्य निहाल बागवान, अजय बोरा, विरेन माने आणि ऋषभ जांनकर यांच्या निस्वार्थी सामाजिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ही नव्याने सुरू झालेली रुग्णवाहिका यापुढेही पूर्णपणे ना-नफा तत्त्वावरच चालवली जाणार असून, पाचगणी आणि परिसरातील नागरिकांसाठी ती मोठी जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष शहारोम जावानमर्दी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers