Home » पांचगणी » पाचगणीत ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा; नगरपरिषद व हिलदारीचा संयुक्त उपक्रम

पाचगणीत ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा; नगरपरिषद व हिलदारीचा संयुक्त उपक्रम

पाचगणी न्यूज नेटवर्क / प्रमोद रांजणे 

पांचगणी : पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद, नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ आणि ‘प्लाॅन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गौरी-गणपतींसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना रोख रकमा, आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्रांनी गौरविण्यात येणार आहे.

​पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी शहरात गणेशोत्सव अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. शाडूच्या अथवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक आणि पुनर्वापरयोग्य सजावट साहित्य, कचऱ्याचे वर्गीकरण, निर्माल्य संकलन, पर्यावरणस्नेही विसर्जन, स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण यांसारख्या घटकांना मूल्यांकनामध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

​या स्पर्धेसाठी लोकप्रतिनिधींकडून आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक १० हजार १ रुपये, बांधकाम सभापती राजेंद्र पार्टे यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक ७ हजार १ रुपये, तर नगरसेवक नरेंद्र बिरामणे यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक ५ हजार १ रुपये दिले जाणार आहे. तसेच घरगुती स्पर्धेसाठी उपनगराध्यक्ष माधुरी कासुर्डे यांच्यातर्फे प्रथम ५ हजार १ रुपये, आरोग्य सभापती राजश्री सणस यांच्यातर्फे द्वितीय ३ हजार १ रुपये आणि महिला व बालकल्याण सभापती सुप्रिया माने यांच्यातर्फे तृतीय १ हजार १ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

​पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील आणि सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणीची अंतिम मुदत १० सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुकांनी पोस्टरवरील क्यूआर कोड अथवा ९५०३०४९०३१ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. “पर्यावरणपूरक उत्सव हीच काळाची गरज असून, ‘स्वच्छ, सुंदर व हरित पाचगणी’ घडवण्यासाठी नागरिक आणि मंडळांनी यात उत्स्फूर्त सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers