पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अखेर पाचगणी आणि परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच सुरू झालेल्या रिमझिम आणि काही काळ कोसळलेल्या दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून, येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे. दरम्यान, या पहिल्याच पावसात पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. मात्र, याच पावसादरम्यान पाचगणी बाजारपेठेतील भाजी मंडईच्या पाठीमागे असलेला एक भलामोठा सिल्वर ओकचा वृक्ष कोसळल्याची घटना घडली.
आज सकाळपासूनच पाचगणी शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने नेहमी गजबजलेल्या पाचगणी बाजारपेठेत भाजी मंडईच्या पाठीमागे असलेला एक जुना सिल्वर ओकचा वृक्ष अचानक उन्मळून पडला. हा वृक्ष थेट टाऊन हॉलच्या इमारतीवर जाऊन कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु इमारतीचा पत्रा आणि छताचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेत वृक्ष हटवण्याचे काम सुरू केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते.
यंदा पाऊस काहीसा उशिराने सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, आज झालेल्या या दमदार सुरुवातीमुळे बळिराजा सुखावला असून, शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतांमध्ये पेरणीपूर्व कामांना वेग दिला आहे. बाजारात बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत शेतीकामांना पूर्ण वेग येण्याची शक्यता आहे.
पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण असल्याने सध्या येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच निसर्गाच्या या सुंदर लहरीचे स्वागत करत पर्यटकांनी पहिल्याच पावसाचा मनमुराद आनंद लुटला. येथील प्रसिद्ध टेबल लँड व पारसि पॉईंट वर पॉईंट्सवर धुक्याची चादर आणि पावसाच्या सरींचा दुहेरी थरार अनुभवत पर्यटक चिंब भिजताना दिसले. काहीसा उशिरा का होईना, पण पावसाने दमदार एन्ट्री केल्यामुळे पाचगणीचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलले असून स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



