पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या पाचगणी शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि ड्रेनेज लाईन स्वच्छतेचे काम अधिक गतिमान व सुरक्षित करण्यासाठी पाचगणी नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘सक्शन जेटिंग’ वाहन दाखल झाले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० आणि १५ व्या वित्त आयोगाच्या स्वच्छता व नागरी सक्षमीकरण अनुदानातून हे अत्याधुनिक वाहन प्राप्त झाले असून, शुक्रवारी (दि. २४ जुलै) नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते या वाहनाचे औपचारिक उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यामुळे शहरातील स्वच्छता, सांडपाणी निसारणाची व्यवस्था आणि पर्यावरण रक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत प्राप्त झालेले टाटा कंपनीचे ‘टी-१९ अल्ट्रा’ मॉडेलचे सक्शन जेटिंग वाहन नगरपरिषदेच्या स्वच्छता यंत्रणेत मैलाचा दगड ठरणार आहे. या वाहनात शक्तिशाली व्हॅक्यूम सक्शन प्रणाली आणि उच्च दाबाची वॉटर जेटिंग यंत्रणा बसवण्यात आलेली आहे.
या तंत्रज्ञानामुळे शहरातील गटारे, ड्रेनेज लाईन्स, सेप्टिक टँक आणि मॅनहोलमधील चिखल, गाळ व कचरा अतिशय वेगाने आणि सुरक्षितपणे शोषून घेणे शक्य होणार आहे. उच्च दाबाच्या पाण्याचा मारा करून पाइपलाइनमधील ग्रीस व कठीण अडथळे दूर केले जातील, ज्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह सतत सुरळीत राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अत्याधुनिक वाहनामुळे ड्रेनेज स्वच्छतेच्या कामातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबणार असून स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य जपले जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी शहराचे मानांकन उंचावण्यासाठीही हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे , घाटजाई नगर विकास आघाडीचे प्रमुख शेखरभाऊ कासुर्डे, मुख्याधिकारी पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक राजेंद्र पारठे, नारायण बिरामने, महेश खांडके, अमित कांबळे, आकाश बगाडे, गणेश कासुर्डे आणि नगरसेविका माधुरी कासुर्डे, विमल भिलारे, शिल्पा माने, स्वाती कांबळे, सुप्रिया माने, परवीन मेमन, अमृता गोळे, राजश्री सणस, अनिता चोपडे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



