Home » पांचगणी » पाचगणी रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अमेय भिलारे, सेक्रेटरीपदी अथर्व बिरामणे ​पाचगणी क्लबमध्ये दिमाखदार पदग्रहण सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

पाचगणी रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अमेय भिलारे, सेक्रेटरीपदी अथर्व बिरामणे ​पाचगणी क्लबमध्ये दिमाखदार पदग्रहण सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : पर्यटन आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहरातील सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ पाचगणी’च्या सन २०२६-२७ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात क्लबच्या अध्यक्षपदी अमेय भिलारे तर सेक्रेटरी (सचिव) म्हणून अथर्व बिरामणे यांनी अधिकृतपणे आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. तरुणाईच्या या नव्या नेतृत्वामुळे पाचगणीच्या सामाजिक पटलावर नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

​पाचगणी क्लबच्या सभागृहात आयोजित या विशेष सोहळ्यास ‘डीआरआर’ अमित भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, नगरसेवक राजेंद्र पारठे, नगरसेविका शिल्पा माने, विमल भिलारे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शहारोम जवामर्दी, जयवंत भिलारे, वरिष्ठ पत्रकार व रोटरी सदस्य राजेंद्र भगत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा भारती बिरामणे यांच्यासह रोटरी परिवार आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

​पदग्रहण सोहळ्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे अमित भोसले म्हणाले, “रोट्रॅक्ट ही केवळ एक संस्था नसून तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजातील तळागाळातील घटकांना मदत करण्याचे एक सशक्त व्यासपीठ आहे. पाचगणी रोट्रॅक्ट क्लबने आजवर अनेक नावीन्यपूर्ण आणि आदर्श उपक्रम राबवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेय भिलारे आणि अथर्व बिरामणे यांच्यासारख्या अभ्यासू व तडफदार तरुण नेतृत्वामुळे क्लबचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

​आपल्या अध्यक्षीय भाषणात नवनिर्वाचित अध्यक्ष अमेय भिलारे यांनी आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या विविध संकल्पनांची व उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुण सहकाऱ्यांच्या उत्साहाच्या जोरावर पाचगणी शहर व लगतच्या ग्रामीण भागात व्यापक आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक मदत, वृक्षारोपण तसेच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारे स्पर्धात्मक उपक्रम राबवले जातील. पाचगणीच्या सर्वांगीण विकासात आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यात रोट्रॅक्ट क्लब नेहमीच अग्रेसर राहील.”

​कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष अमेय भिलारे, सेक्रेटरी अथर्व बिरामणे आणि त्यांच्या संपूर्ण शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

​या सोहळ्यास रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि रोट्रॅक्ट क्लबचे सर्व सदस्य, स्थानिक नागरिक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेक्रेटरी अथर्व बिरामणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers