Home » महाबळेश्वर » पार्वतीपूर पार येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनीचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून उत्साहात; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

पार्वतीपूर पार येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनीचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून उत्साहात; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

पांचगणी न्यूज नेटवर्क

पार : ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथील आदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २०२६ यंदा रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर या कालावधीत अतिशय भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसोंड व ग्रामस्थ मंडळ, पार यांच्या वतीने विविध धार्मिक विधी, हभप महाराजांची हरिकीर्तने, संगीत भजने, महाप्रसाद आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​समर्थ रामदास स्वामींच्या उल्लेखांनुसार श्रीरामवरदायिनी माता ही सर्व युगांमध्ये भाविकांच्या हाकेला धावणारी आद्यशक्ती मानली जाते. कृतयुगात महिषासुरमर्दिनी, त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी रामवरदायिनी, द्वापारयुगात धर्मराजाला कृपाप्रसाद देणारी देवी, तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीशी राहून भवानी तलवार देणारी तुळजाभवानी म्हणजेच ही पारची श्रीरामवरदायिनी माता होय, अशी या पीठाची गाढ ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धा आहे.

​दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा प्रारंभ रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता श्रीरामवरदायिनी आईला जलाभिषेकाने होईल. सकाळी १० वाजता सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात व दिव्य मंत्रघोषात नंदादीप प्रज्वलन करून घटस्थापना केली जाईल. दुपारी महाप्रसादानंतर रात्री ह.भ.प. बी.ए. महाराज (अंबिकाभजनी मंडळ, सिद्धनाथ वाडी, वाई) यांचे भजन रंगणार आहे. १२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान रोज सकाळी व रात्री आरती, दुपारी महाप्रसाद व रात्री संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर रोजी (पंचमी) रात्री १० वाजता विशेष कुंकूमार्चन सोहळा पार पडेल. १६ ऑक्टोबर रोजी षष्टीनिमित्त सकाळी महादेवाला अभिषेक केला जाईल.

​शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी (सप्तमी) रात्री १० वाजता ह.भ.प. विवेक महाराज कोंढरे (कोंढूर, ता. मुळशी) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी (महाअष्टमी) सकाळी सर्व देवदेवतांना अभिषेक, दुपारी १२ वाजता गोंधळ, दुपारी २ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडणार आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी (महानवमी) सकाळी ११.३० वाजता घट हलविणे, श्रीं ची आरती व होमाची पूर्णाहूती होईल.

​मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या (दसरा) दिवशी सायंकाळी ४ वाजता आरतीनंतर ५ वाजता सीमेवर पालखी मिरवणूक निघेल. सायं. ६ वाजता शमीपूजन व सिमोल्लंघन सोहळा पार पडेल. रात्री ७ वाजता पालखीचे मंदिरात आगमन होऊन भाविक एकमेकांना सोनेरुपी शमीपत्रे अर्पण करतील व उत्सवाची सांगता होईल.

​चौकट:

मातेला परिधान केलेली ‘पैठणी’ मिळवण्याची संधी आणि पारायण सोहळा

उत्सव काळात भाविकांसाठी लकी ड्रॉच्या (MEGA DRAW) माध्यमातून देवीला परिधान केलेल्या पैठणी साड्या मिळवण्याची विशेष सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय नवरात्रोत्सवात महिला वर्गाकडून श्री दुर्गासप्तशती पोथीचे संस्कृत व प्राकृत भाषेत रोज पारायण केले जाणार आहे. श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथील श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट व समस्त पार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सर्व भाविकांनी या नवरात्रोत्सवात आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers