Home » Blog » फलटण हादरले! खामगाव येथे विजेचा भीषण धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू; एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला

फलटण हादरले! खामगाव येथे विजेचा भीषण धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू; एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला

पांचगणी न्यूज नेटवर्क

फलटण : तालुक्यातील खामगाव येथे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमधील प्रवाहाच्या संपर्कात आल्याने आणि एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण खामगाव परिसरासह सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर आज पहाटे काळाने घाला घातला. बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका विद्युत वायरमध्ये अचानक वीजप्रवाह उतरला. याच दरम्यान कुटुंबातील प्रमुख पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) हे बाहेर आले असता, त्यांचा या जिवंत वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा तीव्र झटका बसला.

​पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६) या पुढे सरसावल्या, मात्र त्याही या प्रवाहात अडकल्या. आई-वडिलांना मृत्यूच्या दारात पाहून त्यांना वाचवण्यासाठी मुलगा सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनीही धाव घेतली. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. विजेचा प्रवाह इतका भयानक होता की, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील हे चारही सदस्य एकापाठोपाठ एक विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि काही क्षणांतच चौघांचीही प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची गांभीर्य ओळखून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह उत्तरदिसणीसाठी (शवविच्छेदनासाठी) फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.

दरम्यान, महावितरणच्या गलथानपणामुळे हा अपघात घडला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे घराबाहेरील वायरमध्ये वीजप्रवाह उतरला, याचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस आणि विद्युत विभागाचे अधिकारी करीत आहेत.

​कमावते आई-वडील आणि तरुण बहीण-भावाचा असा एकाच वेळी अकाली अंत झाल्याने शिंदे कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव ग्रामस्थांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नसून, संपूर्ण तालुक्यातून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers