पांचगणी न्यूज नेटवर्क
केळघर : काही महिन्यांपूर्वी बिभवी येथे झालेल्या भीषण सिलेंडर स्फोटात संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या पाच पीडित कुटुंबांना अखेर शासनाचा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या बाधित कुटुंबांना एकूण ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
बिभवी येथे घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेत एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, शेजारील तब्बल पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या दुर्घटनेत निष्पाप कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि आयुष्यभराची पुंजी जळून खाक झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी तात्काळ धाव घेत बाधितांचे अश्रू पुसले होते. केवळ सांत्वन करून न थांबता त्यांनी मुंबईत थेट राज्याचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बिभवीतील या भीषण परिस्थितीची भीषणता त्यांच्यासमोर मांडत, या गरीब व कष्टकरी कुटुंबांना शासनाने तात्काळ आर्थिक हातभार लावावा, अशी आग्रही मागणी ओंबळे यांनी केली होती. ओंबळे यांच्या या संवेदनशील मागणीची तात्काळ दखल घेत, पीडित कुटुंबांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
दिलेला शब्द पाळत नुकतीच या बाधित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. अचानक आलेल्या संकटाने कोलमडलेल्या या कुटुंबांना या मदतीमुळे पुन्हा एकदा उभे राहण्याचे बळ मिळाले आहे.
या मदत वाटप प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, युवासेना जिल्हा समन्वयक राजू केंजळे आणि युवासेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाबळेश्वर तालुकाप्रमुख गणेश उतेकर, शिवसेना नेते सचिन जवळ, समाजसेवक सचिन कदम, उपतालुकाप्रमुख राम संकपाळ, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, युवानेते तुषार पार्टे, गावचे सरपंच संतोष बांदल, नामदेव बांदल, वसंत पवार, शिवाजी जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संकटकाळात धावून आलेल्या एकनाथ ओंबळे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे बिभवी ग्रामस्थांनी आणि पीडित कुटुंबांनी अत्यंत भावूक अंतःकरणाने आभार मानले आहेत.



