पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : येथील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘ओव्हर द बोर्ड चेस स्पर्धा २०२६-२७’ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयीची आवड वाढविणे, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने आयोजित या दोन दिवसीय स्पर्धेत तालुक्यातील २२ नामांकित शाळा व बुद्धिबळ अकादमींमधील तब्बल ३६६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पियुष गोराडिया, अदिती गोराडिया आणि प्राचार्य गुप्ता सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळातून शिस्त, प्रामाणिकपणा, निर्णयक्षमता आणि क्रीडाभाव आत्मसात करण्याचा संदेश दिला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज विविध वयोगटांतील खेळाडूंमध्ये अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. लहान वयोगटातील खेळाडूंनीही आपल्या अप्रतिम चालींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या आजच्या फेरीतील अनेक सामने उत्कंठावर्धक ठरले. या स्पर्धेचा उद्या दुसरा आणि अंतिम दिवस असून, उद्याही बुद्धिबळाच्या पटावर असाच चुरशीचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे पीटीआय श्री. प्रकाश सर, श्री. विकी सर, विविध शाळांचे पंच, प्रशिक्षक, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत. या बुद्धीच्या महोत्सवाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.



