Home » पांचगणी » बोगस टॅक्सी वाहतुकीवर कारवाई करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा : पाचगणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे सपोनी दिलीप पवार यांना निवेदन

बोगस टॅक्सी वाहतुकीवर कारवाई करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा : पाचगणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे सपोनी दिलीप पवार यांना निवेदन

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : पाचगणी शहरात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या बोगस आणि बेकायदेशीर खासगी गाड्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा टॅक्सी युनियनच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाचगणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

 

​या निवेदनानंतर सपोनी दिलीप पवार यांनी उपस्थित सर्व टॅक्सी चालकांशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी पर्यटन स्थळाची प्रतिमा उंचावण्यासाठी टॅक्सी चालकांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील टॅक्सी चालकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. सर्व टॅक्सी चालकांनी एकाच ‘ड्रेस कोड’ मध्ये राहावे, जेणेकरून पर्यटकांवर त्याचा चांगला प्रभाव पडेल. सर्व चालक एकाच ड्रेसमध्ये दिसले तरच पाचगणीची टॅक्सी व्यवस्था राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास सपोनी पवार यांनी व्यक्त केला.

 

​यासोबतच, बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. बस स्थानकावर किंवा सार्वजनिक जागेत काही गैरप्रकार, भांडणे अथवा दंगा धोपा झाल्यास टॅक्सी चालकांनी मूकदर्शक न राहता तातडीने पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, अशी जाणीवही यावेळी पोलीस प्रशासनाकडून चालकांना करून देण्यात आली.

 

​संघटना आवारात तसेच टॅक्सी कॅबीन समोर काही टुरिस्ट आणि खासगी गाड्या बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असून, वारंवार समज देऊनही संबंधितांकडून अरेरावी केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या बोगस गाड्यांमुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या स्थानिक टॅक्सी चालकांचे मोठे नुकसान होत आहे. या निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

​निवेदन देताना पाचगणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने टॅक्सी चालक उपस्थित होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers