पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी (प्रतिनिधी): ग्रामीण भागात पर्यटनाचा नवा आदर्श निर्माण करत कष्ट, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथील उद्योजक तथा ‘हॉटेल मयूर ॲग्रो पार्क रिसॉर्ट’चे मालक संजय पांडुरंग मोरे यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासाची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. एकाच दिवशी कोल्हापूर आणि शिर्डी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना राज्यस्तरीय मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या निवडक ६० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील संजय मोरे यांना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागात ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून दर्जेदार पर्यटन सेवा देण्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हा बहुमान त्यांना मिळाला. संजय मोरे यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीवांनी संपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.
कोल्हापूरसोबतच याच दिवशी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे ‘बी द चेंज फाउंडेशन’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मयूर ॲग्रो पार्क रिसॉर्टला सर्वोत्कृष्ट ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट म्हणून ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. सुभेदार मेजर सुनील मोहोड, अभिनेत्री निवेदिता पगार, अरुण भंडारे, डॉ. निलेश गायकवाड, ॲड. योगेश दवंगे, संस्था अध्यक्ष मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
एकाच दिवशी दोन महत्त्वाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने संजय मोरे यांच्यावर भिलार, पांचगणी व महाबळेश्वर परिसरातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे.



