पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : महाबळेश्वर आणि जावली तालुक्याच्या सीमावर्ती भागातील भिलार व परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री भिलारहून मेढा मार्गे भालेघरला जात असताना भिलार-उंबरी दरम्यान नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. चालत्या वाहनातून बिबट्याची ही हालचाल कॅमेऱ्यातही कैद झाली असून, या घटनेमुळे भालेघर व भिलार परिसरातील नागरिक मोठ्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या वेळी भालेघरचे रहिवासी वसंत भिलारे, येशू भिलारे आणि अशोक भिलारे हे सर्वजण भिलारवरून मेढा मार्गे आपल्या भालेघर गावाकडे येत होते. भिलार ते उंबरी दरम्यानच्या रस्त्यावर त्यांना अचानक रस्त्यालगत बिबट्या दिसून आला. नागरिकांनी तत्काळ मोबाईल कॅमेऱ्यात या बिबट्याचे दृश्य टिपले. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांमध्ये भीतीची लाट पसरली आहे.
भिलार व उंबरी हा परिसर शेतीप्रधान असून रोज सकाळी आणि संध्याकाळी शेतकरी, कामगार आणि शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. दिवसेंदिवस या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यापूर्वीही परिसरात दिसला होता बिबट्या
या भागात बिबट्याचे दर्शन घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी भिलार येथे एक बिबट्या विहिरीत पडला होता, ज्याला वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप जीवदान दिले होते. तसेच पांगारी परिसरातही बिबट्याचा वावर आढळून आला होता, तर भोसे येथे वनविभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केले होते. आता पुन्हा एकदा या भागात दुसरा बिबट्या सक्रिय झाल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे भिलार, उंबरी आणि भालेघर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अनर्थ घडण्याआधी वनविभागाने या परिसरात तात्काळ गस्त वाढवावी आणि पिंजरा लावून या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी भिलार व परिसरातील नागरिकांनी केली आहे.



