पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. 14,: पाचगणी-महाबळेश्वर या प्रमुख पर्यटन आणि वाहतुकीच्या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, भोसे खिंडीतील कालाशिल्प दुकानासमोर गुरुवारी पुन्हा एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (MH 11 DD 8456) मुंबईहून महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बसला (MH 14 MH 0492) समोरून जोरदार धडक दिली. सुदैवाने या धडकेत बसमधील प्रवासी बचावले असून, डंपर चालक जखमी झाला आहे. मात्र, या घटनेमुळे या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
केवळ कागदावरच आणि गप्पांमध्येच ‘नवीन तंत्रज्ञानाचा वापर’ करून बनवल्याचा दावा केला गेलेला हा रस्ता सध्या वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्युचा सापळा ठरत आहे. एकट्या भोसे खिंड आणि कालाशिल्प दुकानापुढील परिसरात गेल्या महिनाभरात तब्बल १५ लहान-मोठे अपघात झाले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा गवगवा करत तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर वाहने अचानक घसरणे, ताबा सुटणे आणि समोरासमोर धडक होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
रस्त्याच्या या धोकादायक स्थितीमुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि चालक-वाहकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. “नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग लोकांच्या जीवावर बेतणारा ठरणार आहे का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. प्रशासनाने केवळ वरवरची किंवा मलमपट्टी स्वरूपाची दुरुस्ती न करता, हा संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने तयार करावा किंवा त्याची अत्यंत शाश्वत आणि मजबूत दुरुस्ती तातडीने करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित विभागाने झोपेतून जागे होऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



