पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी आगारातील एका जबाबदार अधिकाऱ्याने प्रवासी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अत्यंत उर्मट आणि अपमानास्पद भाषेत वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उद्दाम वर्तनाचे तीव्र पडसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यात उमटले असून, पत्रकार संघटनांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले असून, या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी विकेंड असल्यामुळे महाबळेश्वर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळावर पर्यटकांची आणि वाहनांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. यामुळे मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने काही बसेस नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार एका बसमध्ये प्रवासी पूर्ण भरले देखील. मात्र, प्रवाशांनी गच्च भरलेली ही बस वेळेत न सोडता आगारातच ताटकळत उभी ठेवण्यात आली.
पुढील प्रवासासाठी एसटी आणि रेल्वे गाठण्याची घाई असलेल्या प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले वाहतूक निरीक्षक अधिकारी शाहरुख खान यांनी सुरुवातीला प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळातच त्यांनी आपली भाषा बदलली. अधिकाऱ्याचा तोल सुटून ते प्रवाशांशी अरेरावी करू लागल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) सुरू केले.
आपला मनमानी कारभार कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे पाहताच संबंधित अधिकारी शाहरुख खान यांचा संयम सुटला. त्यांनी कर्तव्याचे भान विसरून थेट पत्रकारांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पत्रकारांचा अवमान करत अत्यंत अयोग्य, उर्मट आणि अपमानास्पद भाषेचा वापर त्यांनी केला. लोकशाहीत जनतेचा आवाज उठवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना अशा प्रकारे धमकावणे आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे हा थेट पत्रकारितेच्या सन्मानावर झालेला आघात होता.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली आणि साताऱ्यातील संपूर्ण माध्यम जगतातून तीव्र संतापाची लाट उसळली. ‘डिजिटल मीडिया परिषद’, ‘सातारा जिल्हा पत्रकार संघ’ आणि ‘सातारा पत्रकार संघ’ या प्रमुख संघटनांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांनी तातडीने एकत्र येत आधी महाबळेश्वर आणि त्यानंतर सातारा विभागीय कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनाला महाबळेश्वर, सातारा आणि शेजारील पाचगणी येथील पत्रकार संघानेही जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
साताऱ्यातील पत्रकार बांधवांनी अत्यंत कमी वेळात अभूतपूर्व एकजूट दाखवत थेट एसटीच्या विभाग नियंत्रकांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. पत्रकारांचा आक्रमक पवित्रा आणि माध्यम क्षेत्रातील तीव्र भावना लक्षात घेऊन सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण पत्रकारितेची दिलगिरी व्यक्त केली. तसेच, प्राथमिक चौकशीअंती संबंधित उर्मट अधिकाऱ्याचे वर्तन बेजबाबदार असल्याचे स्पष्ट करत त्यांना तात्काळ निलंबित (Suspend) करण्याचे आदेश जारी केले.
अत्यंत कमी वेळात साताऱ्यातील सर्व पत्रकार बांधवांनी पक्ष, माध्यम आणि मतभेद बाजूला ठेवून दाखवलेल्या या एकोप्यामुळेच प्रशासनाला अवघ्या काही तासांत ही मोठी कारवाई करावी लागली. पत्रकारितेवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध आणि दबावाविरुद्ध भविष्यातही अशीच वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार या आंदोलनानंतर जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी व्यक्त केला आहे. या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



