पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : गुणवत्ता आणि यशाची कोणतीही परंपरा खंडित न करता, महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली येथील विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात या शाळेतील दोन विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन करत शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान मिळवला आहे.
या परीक्षेत इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी कु. स्वरा मंगेश सुर्वे हिने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर महाबळेश्वर तालुक्यात थेट ‘प्रथम’ क्रमांक पटकावला आहे, तर सातारा जिल्हा गुणवत्ता यादीत तिने ५९ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. याचबरोबर, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. निलम सुनिल ढेबे हिने देखील अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत तालुका गुणवत्ता यादीत ‘तिसरा’ क्रमांक पटकावून आपले नाव शिष्यवृत्ती धारकांच्या यादीत कोरले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाने चिखली गावासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुरुकुलासारखे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण यशाची परंपरा चिखली येथील जिल्हा परिषद शाळा ही केवळ ग्रामीण भागातील एक शाळा नसून, ती गुणवत्तेचे केंद्र बनली आहे. या विद्यार्थिनींना शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार आणि सचिन जगताप यांचे अत्यंत मोलाचे व अचूक मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आणि विद्यार्थिनींची चिकाटी यामुळेच हे यश शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या शाळेने केवळ यावर्षीच नव्हे, तर सातत्याने शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, विद्या निकेतन आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये आपले नावीन्य व यश राखले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्याचे मोठे काम ही शाळा करत आहे.
विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, आणि केंद्र प्रमुख चंद्रकांत जंगम यांनी शाळेचे व यशस्वी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले आहे.
तसेच गावातील मान्यवर दगडू ढेबे, संजय पार्टे, विनायक पवार, चिखलीच्या सरपंच दिपाली पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लता जाधव, संतोष जाधव, संपत जाधव, कोंडिबा जाधव आणि संतोष मोरे यांसह सर्व ग्रामस्थ, पालकांनी विद्यार्थिनींच्या घरी जाऊन व शाळेत त्यांचा यथोचित गौरव करत पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.



