Home » पांचगणी » राजपुरीचा सुयोग राजपुरे पहिल्याच प्रयत्नात झाला ‘सीए’; खा. नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांकडून कौतुक

राजपुरीचा सुयोग राजपुरे पहिल्याच प्रयत्नात झाला ‘सीए’; खा. नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांकडून कौतुक

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी  : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) च्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत अवघड अशा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावचा सुपुत्र सुयोग गजानन राजपुरे याने आपल्या देदीप्यमान बुद्धिमत्तेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून ‘सीए’ पदवीला गवसणी घातली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यासह पांचगणी परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

​सुयोगने सीए होण्यासाठी आवश्यक असणारे फाउंडेशन, इंटर आणि खडतर मानली जाणारी आर्टिकलशिप हे सर्व टप्पे अत्यंत चिकाटीने आणि पहिल्याच प्रयत्नात पार केले. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पांचगणी येथील नामांकित सेंट झेविअर स्कूलमध्ये झाले असून, तिथे त्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवून आपल्या उज्वल भवितव्याची पायाभरणी केली होती. त्यानंतर त्याने पुण्याच्या नामांकित ‘एस. पी. कॉलेज’मधून बी.कॉम.ची पदवी पूर्ण केली. सुयोगच्या या यशात त्याचे वडील गजानन राजपुरे आणि आजोबा शंकरराव राजपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, संस्कार आणि पाठबळ लाभले.

 

अत्यंत कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर सुयोगने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

​सुयोग राजपुरे याने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील, खासदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी सभापती रुपालीताई राजपुरे, विद्यमान सभापती शकुंतला चोरमले तसेच युवा नेते प्रवीणशेठ भिलारे यांच्यासह सहकार, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले. राजपुरी गावचा आणि तालुक्याचा गौरव वाढवल्याबद्दल सुयोगवर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers