पांचगणी न्यूज नेटवर्क
पाटण : सडावाघापूर (ता. पाटण) येथील विस्तीर्ण पठारावर उंचावर फिरणाऱ्या पवनचक्क्या आता येथील स्थानिक नागरिक, गुराखी आणि पशुधनासाठी थेट ‘मृत्यूचे सापळा’ बनू लागल्या आहेत. गेल्या अवघ्या चार दिवसांत पवनचक्क्यांची महाकाय पाती हवेतच तुटून १50 ते २०० मीटर अंतरावर कोसळण्याच्या सलग दोन गंभीर घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या निकृष्ट आणि जुनाट झालेल्या पवनचक्क्यांमुळे पठारावरील गावांतील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. निष्काळजी प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर एखादी मोठी जीवितहानी अटळ असल्याची भीती व्यक्त करत धोकादायक पवनचक्क्या तातडीने हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी सडावाघापूर पठारावर हरित ऊर्जेच्या निर्मितीसाठी मोठमोठे पवनचक्की टॉवर उभारण्यात आले होते. मात्र, काळाच्या ओघात आणि योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी हे टॉवर आता अत्यंत गंजलेले व निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. जमिनीपासून तब्बल दीडशे ते दोनशे फूट उंचावर फिरणारी ही अतिशय वजनदार पाती अचानक तुटून आजूबाजूच्या परिसरात अन् घरांजवळ उडत जाऊन पडत आहेत. अनेक पवनचक्क्या अगदी लोकवस्तीजवळ आणि शेतांच्या सीमेवर उभ्या असल्याने कोणत्याही क्षणी अंगावर वा घरावर पातं कोसळेल या भीतीने ग्रामस्थ रात्रंदिवस दहशतीखाली जगत आहेत.
सडावाघापूर पठार हे परिसरातील जनावरांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. दिवसभर शेकडो गुरे-ढोरे या उघड्या पठारावर चरत असतात आणि त्यांच्यामागे लहान मुले, महिला व गुराखी फिरत असतात. अशातच आकाशातून थेट मृत्यूसारखी कोसळणारी ही पाती कोणाच्या तरी अंगावर पडून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर या भागातील भीती अधिकच तीव्र होते.
संबंधित पवन ऊर्जा कंपन्या आणि जबाबदार प्रशासकीय यंत्रणा या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वेळेवर सर्व्हिसिंग न करणे आणि जुने, जर्जर झालेले टॉवर जबरदस्तीने चालवणे यामुळेच हे अपघात घडत आहेत. “आम्हाला उजेड देणारी ही पवन ऊर्जा आता आमचा जीव घेण्यास तयार झाली आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
पाटण तालुक्यातील या संवेदनशील समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, धोकादायक व निकृष्ट झालेल्या सर्व पवनचक्क्यांचा वीजपुरवठा खंडित करून त्या तातडीने हटवाव्यात, अशी ठाम भूमिका सडावाघापूरच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



