पांचगणी न्यूज नेटवर्क /चंद्रकांत भोई
वाई : अंधाराचा फायदा घेत मालमत्तेविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत संशयिताला वाई पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. वाई ते पसरणी जाणारे रस्त्यावरील सिद्धनाथवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरात घडणारा एक मोठा गुन्हा टळल्याची चर्चा असून याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१) रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वाई पोलिसांचे पथक परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. सिद्धनाथवाडी येथील वाई-पसरणी रोडने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या घनदाट अंधारात एक इसम अत्यंत संशयितरीत्या स्वतःचे अस्तित्व लपवून वावरत असल्याचे पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेस पडले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन त्याला जागीच घेरले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव शुभम दशरथ भवर (वय २७, रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे सांगितले. कोणत्याही सबळ कारणाशिवाय मध्यरात्री अंधारात लपून बसलेला हा युवक मालमत्तेविरुद्ध (चोरी, दरोडा किंवा घरफोडी) मोठा गुन्हा करण्याच्या हेतूनेच तेथे दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस शिपायांच्या तत्परतेमुळे संशयिताचे मनसुबे उधळले गेले आहेत. पो. कॉ. हेमंत शिवाजी शिंदे (बक्कल नंबर ७९७, रा. पोलीस वसाहत वाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई पोलीस ठाण्यात शुभम भवर याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा (गु. र. क्र. २३५/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
शहर व आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाई पोलीस सध्या विशेष अलर्ट मोडवर आहेत. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. लोलापोड (बक्कल नंबर १९९४) हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.



