पांचगणी न्यूज नेटवर्क
मसूर ः तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज आणि तडफदार प्रशासकीय कार्यशैलीची आठवण करून देणारी कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने कराड तालुक्यात प्रथमच दूध भेसळीविरोधात मोठा धडक छापा टाकला. शामगाव (ता. कराड) येथील एका घरात कृत्रिम म्हशीचे दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले असून, भेसळीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यातील दूध भेसळीच्या रॅकेटची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठल रुपणवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शामगाव येथील ओंकनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या यशवंत फाटक यांच्या राहत्या घरात महेश यशवंत फाटक (वय 44) व स्वाती महेश फाटक (वय 38) हे आर्थिक फायद्यासाठी कृत्रिम म्हशीचे दूध तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (27 जुलै) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली.
कारवाईदरम्यान केशरी रंगाच्या किटलीत तीन लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीत दोन लिटर म्हशीच्या दुधामध्ये रिफाइंड पामोलीन तेल व पांढऱ्या रंगाची संशयित पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. घटनास्थळावरून सुजाता कंपनीचा मिक्सर, त्याचे भांडे, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर तसेच भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण 6,971 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात जप्त केलेले कृत्रिम दूध, पामोलीन तेल व पांढरी पावडर ही मानवी आरोग्यास अपायकारक व असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीनुसार, या कृत्रिम दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा खरेदीसाठी खटाव तालुक्यातील डेअरीच्या संबंधितांशी संगनमत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पामोलीन तेल व पांढऱ्या पावडरच्या पुरवठादाराची माहिती देण्यास आरोपींनी टाळाटाळ केल्याने या प्रकरणामागे मोठे भेसळीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, भेसळयुक्त दूध स्वीकारणारे तसेच कच्चा माल पुरविणाऱ्या संबंधितांचाही शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई उंब्रज पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, हवालदार महेश लावंड, बाळासो कोळेकर, सुनील पन्हाळे, अशोक पाटील तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया इंगवले यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.



