Home » कराड » शेणोलीत ‌‘एमडी ड्रग्ज‌’चा सौदा उधळला! : कराड तालुका पोलिसांची कारवाई ः 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

शेणोलीत ‌‘एमडी ड्रग्ज‌’चा सौदा उधळला! : कराड तालुका पोलिसांची कारवाई ः 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड  ः शेणोली बसस्टँण्ड परिसरात एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीकरीता आलेल्या दोघांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1.890 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन), दोन मोबाईल व एक दुचाकी असा सुमारे 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी एकास अटक केली असून एक विधीसंघर्ष बालक आहे.

अजय यशवंत कापूरकर रा. जुळेवाडी, ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेणोली स्टॅण्ड परिसरात दोघेजण एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीकरीता येणार आहेत. पोलिसांनी स्टॅण्ड परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 1.890 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 1.890 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन), दोन मोबाईल, एक दुचाकी असा 80,800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून दुसरा विधीसंघर्ष बालक आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सदरची कारवाई डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय तावरे, पोलीस हवालदार राजू पाटोळे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, संजय जाधव, विजय यादव, सचिन चिंचकर, प्रतिभा डेरे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers