पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी येथील नामांकित संजीवन विद्यालयाच्या अत्याधुनिक कृत्रिम ‘अॅस्ट्रो टर्फ’ मैदानावर राज्यस्तरीय आंतरशालेय ‘इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप-२०२६’ स्पर्धेचे उद्घाटन झाले. संजीवन विद्यालयाच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत अंडर-१२ आणि अंडर-१५ वयोगटातील मुलांच्या कौशल्याची कसोटी लागणार असून, या निमित्ताने संपूर्ण पाचगणी नगरीत फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमास पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे, नगरसेवक राजेंद्र पारठे, संजीवन विद्यालय ट्रस्टच्या विशेष कार्यकारी विश्वस्त श्रीमती अनघा देवी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मैदानात जाऊन खेळाडूंचा परिचय करून घेत त्यांना क्रीडाभावना व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले. मुख्य पाहुण्यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले, तेव्हा मैदानावर खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शशीताई ठकार, प्रवीण बोधे, शरद ठकार, श्रीमती क्लॅरिस्टा डिसिल्वा, श्रीमती नेहा शहा, श्रीमती आकांक्षा बोंगाळे, महेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय भव्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तब्बल १२ नामवंत शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील सेंट अॅन इंटरनॅशनल स्कूल, नागपूरची ए.ए.आय. फाउंडेशन, महाबळेश्वरचे अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि पाचगणी स्थानिक स्तरावरील न्यू एरा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, विद्यानिकेतन हायस्कूल, सेंट पीटर्स स्कूल, ग्रीन व्हॅली हायस्कूल व यजमान संजीवन विद्यालय आदी मातब्बर संघांचा समावेश आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये युवा फुटबॉलपटूंनी वेगवान खेळ, उत्कृष्ट ड्रिब्लिंग आणि अप्रतिम सांघिक समन्वयाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली.
संजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिरूर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठी व्यासपीठे मिळवून देण्यासाठी संजीवन विद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनामागे संजीवन विद्यालयाचे स्पोर्ट्स को-ऑर्डिनेटर सचिन कांबळे यांचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅस्ट्रो टर्फ मैदानाची तयारी, बाहेरील शहरांतून आलेल्या संघांची निवास-भोजन व्यवस्था, खेळाडूंच्या वैद्यकीय आणि इतर तांत्रिक सुविधांचे चोख व्यवस्थापन त्यांनी सांभाळल्यामुळे ही स्पर्धा उच्च दर्जाची व शिस्तबद्ध झाली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. तर अक्षय जाधव यांनी केलेल्या धावत्या समालोचनामुळे प्रत्येक सामन्यातील थरार आणि रंगत द्विगुणित झाली. पुढील दोन दिवस पाचगणीत हा फुटबॉलचा थरार रंगणार असून, यंदाच्या चॅम्पियनशिपचा किताब कोण पटकावणार, या उत्सुकतेपोटी क्रीडाप्रेमी मैदानावर गर्दी करत आहेत.



