Home » जावळी » सामाजिक बांधिलकीतून चिमुरड्यांना मदतीचा हात! सोनाई शिक्षण सेवाभावी संस्थेकडून विविध गावांतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

सामाजिक बांधिलकीतून चिमुरड्यांना मदतीचा हात! सोनाई शिक्षण सेवाभावी संस्थेकडून विविध गावांतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क

​करहर : नवीन शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून सोनाई शिक्षण सेवाभावी संस्था, वालुथ यांच्या वतीने परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे थेट वाटप करण्यात आले. “भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि आपल्या भुकेतील दोन घास इतरांना देणे ही संस्कृती,” हाच उदात्त विचार डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

 

​या अनोख्या मदत उपक्रमांतर्गत जरेवाडी, रासाई नगर (आखाडे), सलपाने, बलकावडेवाडी, पार्टेवाडी, रामवाडी आणि वालुथ येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. सोनाई शिक्षण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पोफळे, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम आणि सचिव विजय के. पोफळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधत या साहित्याचे वाटप केले. नवीन वह्या आणि पाठीवर नवी कोरी बॅग मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

​संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कदम आणि त्यांचे कुटुंब नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे, याचा अनुभव रामवाडीकरांनी अनेकदा घेतला आहे. आज त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले हे दातृत्व नक्कीच समाजातील इतर घटकांना प्रेरणा देणारे ठरेल. या मदतीमुळे केवळ मुलांचा शैक्षणिक प्रवास सुखकर होणार नाही, तर या निरागस बालकांच्या मनातही ‘भविष्यात आपणही मोठे होऊन समाजाला काहीतरी देणारे बनूया’ हा सुंदर विचार रुजण्यास मदत होणार आहे.

​नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेली ही लाख मोलाची मदत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारी ठरली आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आणि चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक, पालक आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष आनंदराव पोफळे, उपाध्यक्ष. बाळासाहेब कदम, सचिव विजय के. पोफळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानण्यात येत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers