Home » तापोळा » ११ शस्त्रक्रियांच्या वेदनांवर जिद्दीची मात! मुळशीच्या ‘जलपरी’ गीता मालुसरेची इंग्लिश चॅनेलला गवसणी

११ शस्त्रक्रियांच्या वेदनांवर जिद्दीची मात! मुळशीच्या ‘जलपरी’ गीता मालुसरेची इंग्लिश चॅनेलला गवसणी

पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा :शरीराला असह्य करणाऱ्या वेदना, हातातून वाहणारे रक्त आणि मृत्यूच्या दारातून परत आलेले स्विमिंग करिअर… या सगळ्यावर केवळ आणि केवळ अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मात करत भारताची ‘जलपरी’ गीता दीपा महेश मालुसरे हिने जागतिक जलतरण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. जगातील अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी ‘इंग्लिश खाडी’ (इंग्लिश चॅनेल) यशस्वीरीत्या पार करून गीताने जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा मानाने फडकावला आहे. तिच्या या अद्वितीय आणि संघर्षमय यशाचे सध्या जगभरातून कौतुक होत आहे.

​शनिवार, २७ जून २०२६ रोजी गीताने या मोहिमेला सुरुवात केली. इंग्लिश खाडीचे मूळ अंतर ३५ किलोमीटर असले, तरी समुद्रातील प्रचंड लाटा आणि प्रतिकूल हवामानामुळे गीताला प्रत्यक्ष पोहताना तब्बल ५४ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर पार करावे लागले. समुद्राचे थंडगार पाणी आणि लाटांचा तीव्र रोष अंगावर झेलत तिने हे अंतर १४ तास ३१ मिनिटांत पूर्ण केले. ‘इंग्लिश चॅनेल स्विमिंग असोसिएशन’ या जागतिक संस्थेच्या कडक निगराणीखाली ही मोहीम पार पडली. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि प्रतीक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गीताने या ऐतिहासिक कामगिरीसाठी खडतर सराव केला होता.

​मूळची मुळशीची सुवर्णकन्या असलेल्या गीताचा हा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तिने पोहायला सुरुवात केली आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०१७ मध्ये तिने आपल्या १३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईच्या समुद्रात ३२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ तास २६ मिनिटांत पार करून देशपातळीवर खळबळ उडवून दिली होती. सध्या पुणे येथील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतानाही तिने आपल्या स्वप्नांचा पाठलाग कधी सोडला नाही.

​मात्र, गीताचा हा सुवर्णप्रवास सोपा नव्हता. २०२०-२१ मधील कोरोना संकटामुळे दोन वर्षे सराव बंद राहिल्यानंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत तिच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. पोहत असताना तिला ‘जेलीफिश’ या अत्यंत विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. हा दंश इतका भयंकर होता की तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. तिच्या हातावर एका वर्षात तब्बल ११ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. अनेकांना वाटले की गीताचे स्विमिंग करिअर आता संपले, पण गीताने हार मानली नाही.

​गेले वर्षभर ती दररोज आठ ते दहा तास सराव करत होती. हातावरच्या खोल जखमा पूर्ण सुकलेल्या नसताना, सरावादरम्यान हातातून रक्त येत असतानाही तिने पाऊल मागे घेतले नाही. अगदी आठ दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये सराव करतानाही तिला पुन्हा जेलीफिशने दंश केला होता, सुदैवाने तो विषारी नव्हता. इंग्लिश खाडीत पोहत असताना जुन्या जखमांच्या वेदना ठणकत होत्या आणि जेलीफिशचे मानसिक दडपणही होते, मात्र वेदनांना विसरून ती फक्त आपल्या ध्येयाकडे झेपावत राहिली.

​इंग्लिश चॅनेल पार करून गीता थांबणार नाही, तर तिचे मुख्य ध्येय जागतिक कीर्तीचा ‘क्वीन ऑफ ओशन’ (Queen of Ocean) हा बहुमान मिळवण्याचे आहे. यासाठी तिला जगातील सात प्रमुख खाड्या पोहायच्या असून, या ‘सेव्हन ओशन चॅलेंज’ची तिने धडाक्यात सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ती याच वर्षी ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमधील ४६ किलोमीटरची ‘ट्वेंटी ब्रिजेस’ आणि सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील ३२ किलोमीटरची ‘कॅटेलिना चॅनेल’ पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या स्विमिंगमुळे हात गमावण्याची वेळ आली होती, त्याच क्षेत्रात जागतिक कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या गीताच्या या जिद्दीला, चिकाटीला आणि आत्मविश्वासाला आज अवघा देश सलाम करत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers