पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित येथील प्रसिद्ध ॲस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीचा पावन उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मांगल्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठूरायाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी अमर एज्युकेशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक विश्वस्त मा. श्री. अमर विजय बिरामणे, मा. श्री. विजय बिरामणे, मा. सौ. रंजना विजय बिरामणे, मा. सौ. सारिका नरेंद्र बिरामणे व मा. सौ. प्रज्ञा अमर बिरामणे यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. दानवले गुरुजी, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मा. श्री. सचिन बनसोडे, उद्योजक मा. श्री. अमित जोते आणि उद्योजक मा. श्री. संदेश भोईर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण
दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठलाची भावपूर्ण आरती गायली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तिरसपूर्ण भजने आणि पारंपरिक नृत्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. वारकरी संप्रदायातील भक्ती, समता, बंधुभाव आणि सेवेचा संदेश देणारी सुरेख नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली.
पारंपरिक दिंडी सोहळ्याने सोहळ्याची सांगता
या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे पारंपरिक दिंडी सोहळा! वारकऱ्यांच्या वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने या दिंडीत सहभाग घेतला. हातात तुळशी वृंदावन आणि विठ्ठलाची पताका घेऊन निघालेल्या या दिंडीमुळे अवघे पाचगणी क्षेत्र ‘विठ्ठल-रुक्मिणी’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलागुणांचे आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार जपणाऱ्या या सुंदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, सामाजिक एकात्मता आणि आपल्या पारंपरिक मूल्यांबद्दल आदराची भावना दृढ होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नचिकेतास हायस्कूल व ॲस्टॉन हॉस्टेलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि समर्पित कार्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचे कौतुक करण्यात आले.



