Home » गुन्हा » आखेगणीत चोरांचा सुळसुळाट! १३ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील मोटारी अन् केबल वायर्स लंपास; तांब्याच्या दरासाठी बळीराजाला लाखो रुपयांचा फटका!

आखेगणीत चोरांचा सुळसुळाट! १३ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील मोटारी अन् केबल वायर्स लंपास; तांब्याच्या दरासाठी बळीराजाला लाखो रुपयांचा फटका!

पांचगणी न्यूज नेटवर्क

करहर : जावळी तालुक्यातील आखेगणी गावात सध्या शेतकरी एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला आता चोरांनी लक्ष केले असून, गावातील तब्बल १३ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील पाण्याच्या मोटारी, इंजिन आणि महागाड्या केबल वायर्स चोरांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकाच वेळी झालेल्या धाडसी चोऱ्यांमुळे संपूर्ण आखेगणी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

​गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये तांब्याच्या (कॉपर) तारेला मोठ्या प्रमाणावर मागणी असून त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. याच महागड्या तांब्याच्या तारेवर चोरट्यांनी आपला डोळा ठेवला आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आखेगणी परिसरातील शेतांमध्ये शिरकाव केला. विहिरींमध्ये खोलवर सोडलेल्या पाण्याच्या मोटारी आणि इंजिन कष्टपूर्वक बाहेर काढून, त्यातील महागडे तांबे आणि विहिरीला जोडणाऱ्या लांबच लांब केबल वायर्स कापून चोरून नेल्या आहेत. एकाच रात्रीत किंवा लागोपाठ झालेल्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

​सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. अशा भर हंगामातच विहिरीवरील मोटारी आणि केबल वायर्स चोरीला गेल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. नवीन मोटार आणि केबल खरेदी करायची म्हंटले तरी हजारो रुपयांचा खर्च येतो, जो आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आधीच महागाई आणि विजेच्या लपंडावाने त्रस्त असलेला शेतकरी या चोऱ्यांमुळे पार खचून गेला असून पूर्णपणे हतबल झाला आहे.

​गावातील १३ शेतकऱ्यांच्या विहिरी एकाच वेळी टार्गेट केल्या गेल्याने ही चोरी करणारी एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसभर शेतात राबून रात्री घरात झोपायला गेलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टावर चोरांनी पाणी फिरवले आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासही शेतकरी आता घाबरत आहेत. या वाढत्या चोऱ्यांच्या सत्राला तात्काळ आळा घालण्यात यावा, पोलिसांनी आखेगणी आणि परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि तांब्याच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या त्या चोरट्यांना तात्काळ बेड्या ठोकून आमचे साहित्य परत मिळवून द्यावे, अशी आर्त हाक हतबल झालेल्या आखेगणीतील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला मारली जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers