पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतालाच तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागल्याने संपूर्ण शहरावर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक (वेण्णा तलाव) पंपिंग स्टेशनवरील मुख्य एचपी मोटर पंप आणि फ्युज एकाच वेळी जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे पाचगणी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, पुढील दोन दिवस शहराला थेंबभरही पाणी मिळणार नसल्याची अधिकृत माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) अधिकाऱ्यांनी दिली आहे. ऐन कडक उन्हाळ्यात आणि त्यातच पावसाने अद्याप हुलकावणी दिली असल्याने शहरातील जलसाठ्यांवर आधीच प्रचंड ताण आहे, अशातच हा पाणी कपात लागू झाल्याने पाचगणीकरांमध्ये चिंतेचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेण्णा लेक येथील मुख्य पंपिंग यंत्रणेत अचानक शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने ही मुख्य मोटर जळाली. जीवन प्राधिकरणाने तातडीने पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी हे काम अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने ते पूर्ण होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यातच, दोन दिवसांनंतर जरी पाणीपुरवठा पूर्ववत झाला, तरी सुरुवातीला अत्यंत कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण पाचगणी शहरातील पाणी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनपेक्षित संकटामुळे शहरातील गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि बोर्डिंग शाळांची पाण्यासाठी तीव्र धावपळ सुरू झाली असून, नागरिकांना खाजगी टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.
”भरमसाठ बिले घेता, मग ‘स्टँडबाय’ मोटर का नाही?” – ग्राहकांचा थेट सवाल
या संपूर्ण प्रकरणावर आता पाचगणीतील पाणी ग्राहक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरमहा पाण्याचे भरमसाठ बिले वसूल करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी एखादी पर्यायी (Stand-by) मोटर उपलब्ध नसावी, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. “केवळ एक मोटर जळाल्यामुळे संपूर्ण शहराला दिवसांन् दिवस पाण्यापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे? प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका दरवेळी प्रामाणिक करदात्या नागरिकांनाच का बसावा?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. एखादा मुख्य पंप नादुरुस्त झाल्यास तात्काळ दुसरी मोटर सुरू करून पाणीपुरवठा खंडित होणार नाही, असे बॅकअप नियोजन प्राधिकरणाकडे का नाही, यावरून आता पाचगणीत प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.



