Home » पांचगणी » महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने मृत झालेल्या २७ जनावरांच्या भरपाईसाठी आमदार मकरंद आबा पाटील यांची तातडीची पावले; तहसीलदारांना दिले आदेश

महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने मृत झालेल्या २७ जनावरांच्या भरपाईसाठी आमदार मकरंद आबा पाटील यांची तातडीची पावले; तहसीलदारांना दिले आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : सन २०२१-२०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील पशुपालक आणि पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील २३ दुधाळ जनावरे आणि पाचगणी येथील पर्यटन स्थळांवर ओढकाम करणारी ४ अशी एकूण २७ जनावरे दगावली होती. या गरीब पीडित कुटुंबांना आणि व्यावसायिकांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री श्री. ना. मकरंद आबा पाटील यांच्याकडे नुकसानी बाबत दाद मागण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथील निवासस्थानी आमदार मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील मृत जनावरांच्या नुकसान भरपाईचा प्रलंबित विषय त्यांच्यासमोर मांडण्यात आला. जनावरे दगावल्यामुळे अनेकांचे उपजीविकेचे साधन हिरावले गेल्याची भीषण वास्तवता आबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

तहसीलदारांना तात्काळ फोनवरून सूचना

विषयाचे गांभीर्य ओळखून आमदार मकरंद आबा पाटील यांनी तत्परता दाखवली. त्यांनी बैठकीतूनच महाबळेश्वरचे तहसीलदार श्री. सचिन मस्के यांना तात्काळ फोन लावला. “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही पीडितावर अन्याय होता कामा नये,” असे सांगत मृत जनावरांची रखडलेली नुकसान भरपाई संबंधितांना तातडीने मंजूर करून वितरीत करावी, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. आबांच्या या त्वरित निर्णयामुळे प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण चर्चेप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे, वाई तालुकाध्यक्ष श्री. प्रवीण संकपाळ आणि सातारा शहराध्यक्ष श्री. अभिजीत सकटे उपस्थित होते. प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकलेली भरपाई लोकप्रतिनिधींच्या थेट हस्तक्षेपामुळे आता लवकरच बाधितांच्या पदरात पडणार असल्याने महाबळेश्वर आणि पाचगणी भागातील पशुपालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers