पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : जावळी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर वसलेल्या सायघर गावात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरांनी एका बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणी कपाटातील ऐवज लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांत घोटेघर, सायघर, मार्ली या गावांमधे चोरीच्या घटनांचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले असून, पोलिसांच्या गस्तीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायघर येथील रहिवासी किसाबाई बाबुराव धनावडे यांच्या घरात आज सकाळी ही चोरी झाली. घटनेच्या वेळी किसाबाई या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर घरातील इतर सदस्यही घरी नव्हते. घर पूर्णपणे बंद असल्याचा फायदा उठवत दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी मुख्य दरवाजाची कडी आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी थेट घरातील बेडरूम गाठून कपाटाचे कुलूप तोडले आणि कपाटावर ‘डल्ला’ मारला. घरात सध्यातरी कोणीही नसल्यामुळे कपाटातून नेमके काय आणि किती किमतीचे दागिने अथवा रोख रक्कम चोरीला गेली आहे, याचा अचूक आकडा समजू शकलेला नाही. कुटुंबातील इतर सदस्य आल्यानंतरच चोरीच्या एकूण मुद्यामालाचा आकडा स्पष्ट होईल. मात्र, भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे गावात घबराट पसरली आहे.
जावळी तालुक्यातील घोटेघर, सायघर, मार्ली ही गावे डोंगरमाथ्यावर आणि निसर्गरम्य, पण काहीशी निर्जन भागात वसलेली आहेत. याच भौगोलिक परिस्थितीचा गैरफायदा सध्या चोरट्या टोळ्या घेत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत या तिन्ही-चारही गावांमध्ये एकापाठोपाठ एक चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. एकाच भागात वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे “आता सुरक्षित राहायचे कसे?” असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या वेळी तर सोडाच, पण आता भरदिवसाही घरे बंद ठेवणे कठीण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. डोंगरमाथ्यावरील या शांत गावांमध्ये चोरांनी उच्छाद मांडल्यामुळे पोलिसांची गस्त वाढवावी, रात्रीची नाकाबंदी कडक करावी आणि या टोळीचा छडा लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी सायघर, घोटेघर आणि मार्ली परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.



