पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचे शिखर सहज गाठता येते, हे जावळी तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. जावळी तालुक्यातील गणेश पेठ येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या कु. आस्था दीपक कांबळे हिने सर्व अडचणींवर मात करत एलएल.बी. (कायदा) पदवी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पाचगणी पालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते तिचा नुकताच पालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
आस्था कांबळे हिचे प्राथमिक शिक्षण पाचगणी येथील ‘हॅपी हवर्स’ स्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने वाई येथील ‘ज्ञानशलाका’ महाविद्यालयातून आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने मुंबई गाठली आणि येथील नामांकित ‘कर्नाटक लॉ कॉलेज’मधून वकिलीची पदवी (एलएल.बी.) यशस्वीपणे पूर्ण केली. केवळ पदवी मिळवून न थांबता तिने थेट मुंबई उच्च न्यायालयात (हायकोर्ट) प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात करत आपली वकिली क्षेत्रातील घोडदौड सुरू ठेवली आहे. ग्रामीण भागातील आणि त्यातही एका गरीब कुटुंबातील मुलीने थेट मुंबई हायकोर्टापर्यंत मारलेली ही झेप अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना आस्थाने भावूक होत सांगितले की, “माझ्या या यशात माझे वडील पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष दीपक कांबळे आणि आई कविता कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे. कुटुंबाची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि दिलेल्या पाठबळामुळेच मी आज हे यश संपादन करू शकले.”
पाचगणीत आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, पालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेविका विमल भिलारे, नगरसेवक अमित कांबळे, महेश खांडके, नारायण बिरामणे, आकाश बगाडे, तसेच सौ. सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे आणि परवीण मेमन उपस्थित होते.
याशिवाय सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे, महेश माने, अजिज भाई मर्चंट, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा सौ. सुनंदा मोरे, राजू काकडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ, कार्याध्यक्ष अतिश भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आस्थाच्या संघर्षाचे आणि यशाचे कौतुक करत तिला पुढील उज्ज्वल कायदेविषयक कारकिर्दीसाठी आणि वकिली व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एका गरीब कुटुंबातील मुलीने घेतलेल्या या उत्तुंग भरारीमुळे जावळी तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून, आस्थावर सध्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



