पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : “सातारा जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधानाने परिपूर्ण जावे, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. शासकीय सेवेची प्रदीर्घ इनिंग पूर्ण करून बाहेर पडताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. म्हणूनच, ‘आनंदी सेवानिवृत्ती’ ही संकल्पना आणि योजना सातारा जिल्हा परिषदेचे एक मुख्य व आदर्श वैशिष्ट्य ठरावी,” असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी येथे केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘आनंदी सेवानिवृत्ती’ कार्यक्रमात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अजित साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, योजना शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, लेखाधिकारी समाधान चव्हाण यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्यात एप्रिल, मे, जून आणि जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या तब्बल २२२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सेवानिवृत्ती लाभांचे आदेश मान्यवरांच्या हस्ते अत्यंत सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले. यामध्ये शिक्षण (प्राथमिक) विभागातील सर्वाधिक १६३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय ग्रामपंचायत विभागाचे ११, सामान्य प्रशासन विभागाचे १०, आरोग्य विभागाचे १८, पशुसंवर्धन विभागाचे ७, बांधकाम (उत्तर) विभागाचे ६, कृषी विभागाचे ३, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे ३ आणि अर्थ विभागाच्या १ कर्मचाऱ्याला या योजनेचा थेट लाभ मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी ‘आनंदी सेवानिवृत्ती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर पार्श्वभूमी मांडली. ते म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी या प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ मिळावेत, यासाठी अर्थ आणि सामान्य प्रशासन विभागासह सर्वच यंत्रणांनी युद्धपातळीवर काम केले, असे सांगत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे विशेष आभार मानले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनी प्रशासनाच्या गतिमानतेचे कौतुक केले. ते म्हणाले, “कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची सर्वोत्तम वर्षे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी दिली आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ व प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, ही अत्यंत आनंदाची बाब असून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सातारा जिल्हा परिषद नेहमीच सकारात्मकतेने उभी राहील.”
जिल्हा परिषदेच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने भावना व्यक्त करताना कराड तालुक्यातील वहागांव केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख श्रीमती शिवांजली प्रल्हाद साळुंके आणि फलटण तालुक्यातील गिरवी केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख श्रीमती राजश्री संभाजी कुंभार यांनी प्रशासनाचे आभार मानले. निवृत्तीच्या दिवशीच सर्व शासकीय लाभ हातात मिळाल्यामुळे भविष्याची चिंता मिटली असून, हा सन्मान आयुष्याची शिदोरी ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन जावली तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती अंजली गोडसे यांनी केले. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील समाधान यांमुळे हा सोहळा अत्यंत भावनिक आणि यशस्वी ठरला.



