पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्यात, सातारा जिल्ह्यातील ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार येथील नामांकित स्ट्रॉबेरी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी गणपतराव रामचंद्र पार्टे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबईतील वरळी येथील डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर १ जुलै रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला.
राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतराव पार्टे यांना दोन लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. गणपतराव पार्टे यांनी महाबळेश्वर-पाचगणी आणि भिलार परिसरात स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये अनेक आधुनिक आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आणि प्रयोगशीलतेचा गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्ताने झाला असून, यामुळे सातारा जिल्ह्याच्या कृषी वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या दैदिप्यमान यशाबद्दल गणपतराव पार्टे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीनकाका पाटील, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी पार्टे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. “पार्टे यांनी शेती क्षेत्रात केलेले कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या कामगिरीचा गौरव केला.
या ऐतिहासिक यशाबद्दल भिलार गावासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. भिलारचे ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक, राजकीय, तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी गणपतराव पार्टे यांच्या निवासस्थानी भेट देऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा पुरस्कार भिलारच्या मातीचा आणि प्रत्येक कष्टकरी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याचा सन्मान असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भिलारकरांकडून ‘मातीचा लाल’ गणपतराव पार्टे यांचा भव्य सत्कार!…
गणपतराव पार्टे यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण भिलार परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. मुंबईतील पुरस्कार सोहळ्यानंतर गणपतराव पार्टे यांचे भिलार या आपल्या कर्मभूमीत आगमन होताच त्यांचा सत्कार केला यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीण भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, अर्जुन धनावडे आणि शशिकांत भिलारे तसेच युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.



