पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी :
जावली तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या सायघर गावावर निसर्गाचा कोप झाला असून, मुसळधार पावसामुळे येथील डोंगर खालच्या दिशेने सरकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगर खचल्याने खालील घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, सध्या संपूर्ण सायघर गाव प्रचंड भीती आणि दडपणाखाली वावरत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायघर हे गाव हातगेघर गावाच्या डोंगर माथ्यावर वसलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दुर्गम आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. त्यातच काल रात्री या परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. रात्रीच्या गडद अंधारात अचानक शंकर दगडू धनावडे आणि विष्णू दगडू धनावडे यांच्या घराच्या वरच्या बाजूला असणारा डोंगर खचून खाली कोसळल्याचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या भीषण आवाजाने संपूर्ण गाव हादरून गेले.
डोंगर कोसळत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या धाडसी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखत नागरिकांनी ढिगाऱ्याखाली गाडल्या जाण्याच्या भीतीने भयभीत झालेल्या दोन्ही धनावडे कुटुंबांतील सदस्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. ग्रामस्थांच्या या तत्परतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
ही घटना सायघर गावाच्या पुढे असलेल्या गणेश मंदिराच्या लगतच्या भागात घडली असून, डोंगर सरकल्यामुळे या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या अन्य दोन घरांनाही आता थेट धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने डोंगराचा उर्वरित भाग कधीही खाली कोसळू शकतो, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव मानकुंमरे यांनी तातडीने सायघर गावात धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून पीडित कुटुंबांना धीर दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मानकुंमरे यांनी तात्काळ जिल्हा प्रशासन, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, गावात तातडीने मदतकार्य आणि उपाययोजना सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या भागाचे तत्परतेने सर्वेक्षण करून ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी आर्त हाक आता सायघरवासीयांकडून दिली जात आहे.



