पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी :महाबळेश्वर जवळील भोसे गावामध्ये एका २५ वर्षीय पर्यटकाची स्थानिक चौघांनी मिळून बेदम मारहाण, करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘घराच्या दिशेने डोकवल्याचा’ संशय आल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा अमानुष हल्ला करण्यात आला. या घटनेत अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला असून पाचगणी पोलिसांनी चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण येथून अक्षय जाधव हा त्याच्या मित्रांसह भोसे येथील ‘अतिथी व्हिला हॉटेल’मध्ये पर्यटनासाठी आला होता. बुधवारी रात्री अक्षयने जास्त मद्यप्राशन केल्यामुळे मित्रांनी त्याला खोलीत झोपवले आणि ते टेरेसवर गेले. दरम्यान, दारूच्या नशेत अक्षय खोलीबाहेर पडला. तो आरोपींच्या घराच्या बाजूला गेला असता, त्यांनी अक्षय घरात डोकवत असल्याच्या संशयावरून त्याला लाकडी काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केली.
हॉटेलबाहेर गर्दी पाहून मित्रांनी तिथे धाव घेतली, तेव्हा अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पाचगणी, वाई आणि नंतर बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सूर्यकांत गोळे (रा. भोसे), अविनाश भोसले (रा. बावधन), राहुल राजपुरे (रा. कनुर) आणि अमोल वाडकर (रा. चिखली) या चौघांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.



